25/04/2022
महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये अनेक उद्योगांचा सिंहाचा वाटा आहे. महाराष्ट्राला तर उद्योग व्यवसायांची प्रदीर्घ परंपरा लाभली आहे. सकाळ माध्यम समूहाच्या वतीने महाराष्ट्राच्या औद्योगिक व्यावसायिक जडणघडणीत मोलाचं योगदान देणाऱ्या महाब्रँड्सचा आज सन्मान करण्यात आला. कोल्हापुरातीलच नव्हे तर भारतातील सुप्रसिद्ध घाटगे ग्रुपच्या वतीने राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष तसेच भारताचे माजी संरक्षण मंत्री, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवारसाहेब व माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते घाटगे ग्रुपच्या संचालिका सौ. साधना घाटगे, ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर सतीश घाटगे व संचालक गौरव घाटगे यांनी पुण्यात हा सन्मान स्वीकारला. यावेळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार उपस्थित होते..
घाटगे ग्रुपने 84 वर्षांपूर्वी कोल्हापूरात आपल्या उद्योगांची मुहूर्तमेढ रोवली. सायकलींपासून अवजड व्यावसायिक वाहनं तसेच कुरिअर पासून प्रवासी वाहतूक क्षेत्रात घाटगे ग्रुपमधील कंपन्यांनी वेगळे मापदंड निर्माण केले आहेत. घाटगे ग्रुपमधल्या सर्वच कंपन्या ग्राहकांना केंद्रबिंदू मानून व्यवसाय करत असल्यामुळे लाखो ग्राहकांशी नाळ जोडली गेली आहे. यासाठी सर्व कंपन्यांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक वेळा गौरवण्यात आलं आहे. अशा सन्मानांमुळे खरं तर जबाबदारी वाढते आणि भविष्यातील आव्हाने पेलण्याची ताकद पण मिळते. आज घाटगे ग्रुपमधील सर्व कंपन्या आपापल्या व्यवसायात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाल्या आहेत. येणाऱ्या काळातील आव्हाने पेलण्यासाठी आमचा ग्रुप नेहमीच तयार आहे, आणि यातून जे सर्वोत्तम तेच घडवण्यासाठी घाटगे ग्रुप सतत कार्यरत राहील..