27/04/2026
'वायफळ बोलून स्वतःचा कचरा करू नका'; रवी राणा यांचा विजय वडेट्टीवार यांच्यावर प्रहार
अमरावती:
राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध पेटलेले असतानाच, आता आमदार रवी राणा यांनी काँग्रेस नेते आणि विजय वडेट्टीवार यांच्यावर अत्यंत तिखट शब्दांत टीका केली आहे. "वडेट्टीवार यांनी आपल्या मर्यादेत राहावे, वायफळ बडबड करून स्वतःचा कचरा करू नये," अशा शब्दांत राणा यांनी आपला संताप व्यक्त केला.
'लव्ह जिहाद काँग्रेसच्या रक्तात'
प्रसारमाध्यमांशी बोलताना रवी राणा यांनी वडेट्टीवार यांच्यावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, "लव्ह जिहाद ही संकल्पना काँग्रेसच्या रक्तातच भिनलेली आहे." वडेट्टीवार यांच्या वक्तव्यांचा समाचार घेताना राणा पुढे म्हणाले, "त्यांची औकात किती आणि ते बोलतात किती? त्यांनी फक्त आपल्या पगारापुरतेच बोलावे, जास्त शहाणपणा शिकवू नये."
महिलांच्या सन्मानाचा मुद्दा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात महिलांचा सन्मान सर्वोच्च आहे, याची आठवण करून देत राणा म्हणाले, "हा महाराष्ट्र शिवरायांचा आहे. इथे महिलांविषयी बोलताना भान ठेवून आणि व्यवस्थितच बोलले पाहिजे. जर वडेट्टीवार समोरासमोर आले, तर त्यांना प्रत्यक्ष भेटूनही मी योग्य समज देईन," असा सज्जड दमही त्यांनी यावेळी दिला.
राजकीय वातावरण तापले
गेल्या काही दिवसांपासून वडेट्टीवार यांनी केलेल्या काही विधानांमुळे महायुतीचे नेते आक्रमक झाले आहेत. मात्र, रवी राणा यांनी थेट 'औकात' आणि 'पगारा'वरून केलेल्या टीकेमुळे आता काँग्रेस काय प्रत्युत्तर देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.