15/09/2015
नाशिक, त्र्यंबकेश्वर - पहिल्या शाहीस्नानाच्या तुलनेत शिथिल करण्यात आलेला बंदोबस्त, भाविकांना मिरवणूक बघण्यासाठी व स्थानिकांना स्वागत करण्यासाठी दिलेली मोकळीक व शाही मिरवणुकीतील सर्व भाविकांना शाहीस्नान करू दिल्यामुळे सर्व आखाड्यांचे महंत प्रफुल्लित झाले आहेत. दुसऱ्या शाहीस्नानाचा महायोग साधण्यासाठी देशभरातील भाविकांची संख्या मोठी असल्यानेही त्यांनी प्रसन्नता व्यक्त केली. या संबंधी प्रमुख साधू-महंतांनी व्यक्त केलेल्या भावना.
स्वामी सागरानंद सरस्वती : सुरक्षितेसाठी बंदोबस्त ठेवणे, हे पोलिसांचे कामच आहे. तो कमी करण्याबाबत आमच्या काहीही सूचना नव्हत्या. केवळ स्थानिक रहिवाशांनाही त्यांच्याच गावातील उत्सवात आनंदाने सहभागी होण्याचे नियोजन करावे, असे आमचे म्हणणे होते. दुसऱ्या शाहीस्नानाला भाविक येणारच होते. बंदोबस्त कसाही असता, तरी ते आलेच असते. फक्त पोलिसांच्या सौजन्यशीलतेमुळे त्यांची यात्रा अधिक आनंददायी झाली एवढेच.
महंत नरेंद्रगिरी (अध्यक्ष, अखिल भारतीय आखाडा परिषद) : सिंहस्थ कुंभमेळा हा लोकोत्सव आहे. त्यात भाविकच सहभागी होत नसतील तर त्या सोहळ्याचा उपयोग काय, असे आमचे म्हणणे होते. आम्ही प्रशासनाला हे वारंवार सांगितलेही होते. पहिल्या शाहीस्नानाच्या वेळी त्यांनी ऐकले नाही. परंतु, दुसऱ्या शाहीस्नानावेळी त्यांनी योग्य नियोजन केल्याचा परिणाम आपल्या सर्वांसमोर आहे. पुढच्या शाहीस्नानालाही त्यांनी असेच नियोजन केल्यास भाविकांची संख्या आणखी वाढू शकते.
महंत हरिगिरी (महामंत्री, आखाडा परिषद) : भाविकांची पायपीट थांबविण्यात यावी व त्यांना सन्मान मिळावा, अशी आमची इच्छा होती. तसेच आमच्या महामंडलेश्वरांबरोबर असलेल्या भाविकांनाही आनंदाने स्नान करू द्यावे, असे आमचे म्हणणे होते. प्रशासनाबरोबरच्या बैठकीत आम्ही हे मुद्दे मांडून आमच्या व्यथा नजरेस आणून दिल्या होत्या. त्यांनीही या सूचनांचे पालन केल्याने हा मेळा यशस्वी झाला, त्याबद्दल सर्वजण कौतुकास पात्र आहेत.
महंत उदयगिरी (अटल अखाडा) : पोलिसांनी भाविकांची फार कोंडी केली नाही. भाविकांची पायपीट थांबविली. आखाड्यांच्या भक्तांनाही साधूंसोबत स्नानास मोकळेपणाने येऊ दिले, हे सर्व ठीक आहे. परंतु, आमच्या मिरवणुकीतील महामंडलेश्वर गीता भारती यांना त्र्यंबकेश्वर मंदिरात जाण्यापासून रोखणे ही अक्षम्य चूक आहे. कुशावर्त तीर्थ किंवा मंदिर या ठिकाणी स्थानिक पोलिस किंवा अधिकारी यांना निर्णय घेण्याचे अधिकार द्यावेत व बाहेरून आलेल्यांनी, ते सांगतील त्याप्रमाणे वागले पाहिजे. म्हणजे असे प्रकार घडणार नाहीत.
महंत डॉ. बिंदू महाराज (प्रवक्ता, षडदर्शन आखाडा परिषद) : पोलिसांनी भाविकांची पायपीट थांबविली व भाविकांची यात्रा आनंददायी होईल, यासाठी प्रयत्न केले ही निश्चितच चांगली गोष्ट आहे. परंतु, शाहीस्नानाच्या दिवशी त्र्यंबकेश्वरमध्ये लाखो भाविक येतील व प्रत्येकाला एवढ्या दूर आल्यानंतर त्र्यंबकेश्वराचे दर्शन घ्यावेसे वाटणे स्वाभाविक आहे. परंतु, देवस्थानने याचा विचार करून कुठलेही नियोजन केले नव्हते. त्र्यंबकेश्वराचा मुकुट करून तो मंदिराच्या प्रांगणात उभा केला असता किंवा गावामध्ये ठिकठिकाणी टीव्ही स्क्रीन लावून प्रत्येक्ष ज्योतिर्लिंगाचे दर्शन त्यावरून घडविले असते, तरी त्यांना समाधान वाटले असते.
महंत विचारदास (नया उदासीन आखाडा) : दुसऱ्या महत्त्वाच्या शाहीस्नानास देशभरातून भाविक मोठ्या संख्येने आले आणि त्या सर्वांना कुशावर्तावर स्नान करण्यास प्रशासनाने परवानगी दिली, यामुळे आनंद वाटला. त्यामुळे भाविकांच्या भावनांचा आदर झाला. आणखीही चांगले नियोजन करून अधिकाधिक भाविकांना कुशावर्तावर स्नान करता येणे शक्य आहे. त्या दृष्टीने पोलिसांनी प्रयत्न करायला पाहिजेत.
महंत सत्यगिरी (सचिव, आवाहन आखाडा) : पोलिसांच्या चांगल्या नियोजनामुळे सर्व शाही मिरवणुका आनंदात झाल्या. यामुळे सर्व साधू समाजालाही आनंद झाला तसेच येथे शाही मिरवणुका बघण्यासाठी आलेल्या भाविकांनीही आनंदाने हा उत्सव साजरा केला.
जगद्गुरू नरेंद्रायार्च (नाणिज धाम, महाराष्ट्र) ः राज्याचे मंत्री, सिंहस्थ कुंभमेळा मंत्री यांनी व्यक्तिशः लक्ष घातल्याने दुसरे शाहीस्नान आदर्शरीत्या पार पडले. प्रसारमाध्यमांनी पहिल्या शाहीस्नानातील त्रुटी परखडपणे धर्माच्या हितासाठी लोकांपुढे मांडल्या, त्यातून चांगला संदेश गेला. कुंभमेळा यशस्वी होण्यासाठी असंख्य अधिकारी व कर्मचारी राबले. निरलस स्वयंसेवकांच्या कामाने दुसरी शाहीस्नान आनंददायी ठरले.